ओढ | ODH — Overseas Diaspora & Heritage
माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचला तरी त्याच्या मुळांचा प्रवास मात्र मातृभूमीतच सुरू झालेला असतो. शिक्षण, व्यवसाय, रोजगार किंवा विविध संधींच्या निमित्ताने मराठी माणूस आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे आणि आपल्या कर्तृत्वातून विविध क्षेत्रांत योगदान देत आहे. भौगोलिक सीमा ओलांडून जगभर विखुरलेल्या या मराठी माणसाचे मातृभूमीशी असलेले नाते मात्र आजही तितकेच जिवंत आहे. आपल्या इतिहासाच्या, संस्कृतीच्या, परंपरांच्या आणि वारशाच्या असंख्य कथा त्या मातीशी जोडलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन व कार्य, स्वराज्याची संकल्पना, गड-किल्ल्यांचा इतिहास, पराक्रम आणि त्यागाच्या कथा, महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, व्यक्तिमत्त्वे, भूगोल आणि समृद्ध वारसा यांची ओळख प्रत्येक पिढीला असणे आवश्यक आहे. मात्र परदेशात वाढणाऱ्या अनेक मराठी कुटुंबांसाठी या वारशाशी प्रत्यक्ष परिचय होण्याच्या संधी तुलनेने मर्यादित असतात. शालेय अभ्यासक्रमात प्रत्येक गोष्ट समाविष्ट असेलच असे नाही, पाठ्यपुस्तकांपलीकडील इतिहास आणि सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्यासाठी आवश्यक माध्यमे सहज उपलब्ध असतीलच असे नाही आणि मातृभूमीपासूनचे भौगोलिक अंतर वाढल्याने या गोष्टींपर्यंत पोहोचणे आणखी कठीण होऊ शकते. परंतु जाणून घेण्याची उत्सुकता मात्र तिथेही असते. आपली मुळे कुठे आहेत, आपल्या पूर्वजांनी काय घडवले, आपल्या मातृभूमीचा इतिहास काय आहे, तिच्या गड-किल्ल्यांमागच्या कथा कोणत्या आहेत, आपल्या परंपरांचा अर्थ काय आहे आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचे स्वरूप काय आहे, हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक पिढीत निर्माण होऊ शकते. या जिज्ञासेला आपल्या मातीशी जोडणारे एक माध्यम उपलब्ध करून देण्याच्या विचारातून ‘ओढ’ या उपक्रमाची संकल्पना आकाराला आली. ‘ओढ’ हा केवळ परदेशातील मराठी समाजाशी संवाद साधण्याचा उपक्रम नसून, जगाच्या विविध भागांत राहणाऱ्या मराठी माणसाला आपल्या इतिहास, संस्कृती आणि मातृभूमीच्या वारशाशी जोडण्याचा एक प्रयत्न आहे. वय, देश किंवा पिढी यांची मर्यादा न ठेवता, ज्यांना आपल्या मुळांविषयी जाणून घ्यायचे आहे अशा प्रत्येकासाठी हे व्यासपीठ खुले राहील. या उपक्रमांतर्गत विविध वयोगटांसाठी ऑनलाइन संवादात्मक सत्रांचे आयोजन केले जाईल. इतिहास केवळ ऐकवण्यापुरता मर्यादित न ठेवता प्रश्नोत्तर, चर्चा, संवाद आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून तो समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन व नेतृत्व, स्वराज्याची संकल्पना, महाराष्ट्रातील गड-किल्ले, इतिहासातील महत्त्वाच्या घटना व व्यक्तिमत्त्वे, महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा, भूगोल, कला आणि विविध पैलूंमधून आपल्या वारशाची ओळख करून दिली जाईल. मात्र मातृभूमीशी असलेले नाते केवळ ऑनलाइन माध्यमातून अनुभवता येत नाही. इतिहास ज्या भूमीवर घडला, त्या भूमीला प्रत्यक्ष पाहणे, तिच्या वास्तूंना स्पर्श न करता त्यांचा इतिहास समजून घेणे, गड-किल्ल्यांवर उभे राहून त्या परिसराचा अनुभव घेणे आणि आपल्या सांस्कृतिक वारशाशी प्रत्यक्ष परिचय करून घेणे हा या जोडणीचा पुढचा टप्पा असेल. म्हणूनच भारतभेटीवर येणाऱ्या सहभागींसाठी गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आणि सांस्कृतिक वारसास्थळांच्या नियोजित heritage tours आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल. संबंधित स्थळाचा इतिहास, त्याचे महत्त्व, स्थापत्य, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यामागील कथा समजून घेत हा प्रवास केवळ पर्यटनापुरता मर्यादित न राहता अनुभवातून इतिहास जाणून घेण्याची संधी ठरेल. परदेशात जन्मलेली किंवा वाढलेली पिढी असो, परदेशात स्थायिक झालेले पालक असोत किंवा आपल्या मातृभूमीशी पुन्हा अधिक जवळून जोडले जाऊ इच्छिणारे कुणीही असो. आपल्या मुळांशी संवाद साधण्यासाठी प्रत्येकाला एक दुवा मिळावा, हा ‘ओढ’चा प्रयत्न आहे. कारण मातृभूमीपासूनचे अंतर कितीही असो, इतिहासाशी नाते जोडण्यासाठी आणि आपल्या मुळांकडे परतण्यासाठी मनातली ‘ओढ’ पुरेशी असते! मातृभूमीची ओळख अधिक जवळून जाणून घेता यावी, यासाठी ‘ओढ’ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे!!
ऑनलाइन सत्रे
इतिहास आणि वारशाशी संवाद
पर्यटन नियोजन
मातृभूमीशी प्रत्यक्ष जोडणारे प्रवास