← सर्व लेख
लेख
“माझंही ऐकून घ्याल का...?”
मी गड बोलतोय...
हो, तोच... ज्याच्या दगडांना महाराजांच्या पावलांचा स्पर्श झाला, ज्याच्या अंगाखांद्यावर स्वराज्याची स्वप्नं वाढली, ज्याच्या मातीत मावळ्यांचं रक्त मिसळलं आणि ज्याच्या तटावर भगवा स्वाभिमानाने फडकला. शेकडो वर्षे वादळं आली... पाऊस पडला... साम्राज्यं आली-गेली... पण मी ढासळलो नाही. पण आजकाल मला एका वेगळ्याच युद्धाला सामोरं जावं लागतंय. कोणी माझ्यावर कचरा टाकतो, कोणी दारूच्या नशेत माझाच अपमान करतो, कोणी माझ्या अंगावर स्वतःचं नाव कोरून अमर होण्याचा प्रयत्न करतो आणि कोणी माझ्या वेदनांनाच रील्स, मीम्स आणि TRP चा विषय बनवतो. मी तरीही शांत बसतो!! कारण मला वाटतं, माझी लेकरं आहेत ही. कधीतरी समजून घेतील.
पण कसलं काय... किती समजून घ्यायचं?
प्रत्येक वेळी मला वाटतं, "यावेळी तरी बदल होईल..." पण पुन्हा तेच. एखादी दुर्दैवी घटना घडली की क्षणात माझं नाव देशभर पोहोचतं पण कोणी माझ्या इतिहासाची चर्चा करत नाही, माझ्या स्वराज्याची आठवण काढत नाही, माझ्या वैभवाचा गौरव करत नाही. माझी ओळखच एखाद्या वाईट बातमीपुरती मर्यादित करून टाकली जाते. माझ्या नावावर TRP मिळते, माझ्या वेदनांवर मीम्स बनतात आणि काही क्षणांचं मनोरंजन संपलं की, पुन्हा मी एकटाच उभा राहतो!
माझा वापर करायचाच असेल, तर माझ्यावर एक झाड लावा. एक प्लास्टिकची पिशवी उचला. एका लहान मुलाला माझी गोष्ट सांगा. असं काही करा... की जग म्हणेल, 'हा तो गड... ज्याला इतिहासाने महान केलं आणि आजच्या पिढीने जपलं.'
मला ट्रेंडिंग करायचंच असेल तर माझ्या अपमानासाठी नाही...माझ्या अभिमानासाठी करा. इतिहासाने मला ओळख दिली, आता ती ओळख जपण्याची जबाबदारी तुमची आहे.
मी आजही ताठ उभा आहे कारण मला महाराजांनी आणि असंख्य मावळ्यांनी उभं केलं. पण मला तसंच ताठ ठेवायचं काम आता तुमचं आहे. उपकार नकोत... फक्त मला पुन्हा लाज वाटेल असं काही करू नका!!🙏
― श्रेयस अस्मिता समिंद्र पाटील ✍🏻©
माझंही ऐकून घ्याल का...?
17 October 2026