स्वराज्याच्या इतिहासात विजयांच्या गाथा सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेल्या पण त्या विजयांसाठी आयुष्यभर प्रतीक्षेची शिक्षा भोगणाऱ्या घरांच्या वेदना मात्र काळाच्या पडद्याआड राहिल्या. रणांगणावर मावळे धारातीर्थी पडले पण त्यांच्या जाण्यानं काही घरांत आयुष्यभर न विझणारी दुःखाची ज्योत पेटली. इतिहासात ज्यांच्या त्यागाला शब्द मिळाले नाहीत, अशाच असंख्य अनामिक मावळ्यांच्या कुटुंबांना समर्पित ही एक काल्पनिक गोष्ट… 🚩 रात्र बरीच झाली होती. गावाच्या वेशीवरचा रस्ता अंधारात हरवून गेला होता. घराघरांतल्या चुली विझल्या होत्या. दिवसभर कष्ट करून थकलेली माणसं झोपेच्या अधीन झाली होती. आकाशात चंद्र होता पण त्याचा प्रकाशही त्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचताना जणू थांबत होता. त्या एका छोट्याशा घराच्या दारात मात्र अजूनही दिवा तेवत होता. दिव्याची वात अधूनमधून वाऱ्याने थरथरत होती. तेल संपत आलं होतं. ज्योतीभोवती काळसर धूर जमा झाला होता. पण घरातल्या त्या म्हाताऱ्या आईला दिवा विझू द्यायचा नव्हता. कारण तिचं लेकरू अजून घरी परतलं नव्हतं. कित्येक दिवसांपूर्वी तो घरातून निघाला होता. अंगावर चिलखत, कमरेला तलवार, डोक्यावर मुंडासं आणि डोळ्यांत स्वराज्याचं स्वप्न घेऊन निघाला होता. निघताना आईच्या पायांवर डोकं ठेवून म्हणाला होता, “आई, स्वराज्याची कामगिरी हाय. जाऊन येतो. काळजी करू नकोस!” आईने त्याच्या कपाळावर हात ठेवला. औक्षण करताना ओवाळणीच्या ताटातल्या दिव्याची ज्योत त्याच्या चेहऱ्यावर पडली. त्या प्रकाशात तिला आपला मुलगा मोठा झाल्यासारखा दिसलं. कालपर्यंत तिच्या पदराला धरून फिरणारं लेकरू आज स्वराज्याच्या कामासाठी घराबाहेर पडत होतं. तिच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं. पण तिने ते त्याला दिसू दिलं नाही. कपाळावर कुंकवाचा टिळा लावला, हातात भाकरीची शिदोरी दिली आणि म्हणाली, “राजांची सेवा इमानानं कर. आणि वेळ मिळाला की घरी ये. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेय रे मी!” तो बारीकसा हसला. आईच्या पायांवर पुन्हा एकदा डोकं टेकवलं आणि वळून निघून गेला. तिला तेव्हा कुठं माहीत होतं की आपल्या लेकराच्या पाठीवरून फिरवलेला तो हात, त्याच्या कपाळावर घेतलेला तो शेवटचा मुका आणि दारातून त्याला पाहिलेली ती शेवटची नजर, हे सगळं तिच्या आयुष्यात पुन्हा कधीच परतणार नव्हतं. दिवस सरत गेले. सकाळी उठल्यावर ती आधी घरासमोरचा रस्ता पाहायची. दुपारी कुणी गावाकडून आलं की त्याला विचारायची, “काही खबर आहे का रे माझ्या लेकराची?” कुणी म्हणायचं, “मावशी, महाराजांची मोहीम चालू हाय.” कुणी धीर द्यायचं, “मावशी, एवढ्यात काय काळजी करतेस? येईल बघ तुझा लेक परत!” ती मान डोलवायची. तिच्या चेहऱ्यावर हसू यायचं. पण त्या हसण्यामागे विचार यायचा, “माझं लेकरू सुखरूप असेल ना?” रात्री जेवण वाढताना तिचा हात नकळत थांबायचा. ताटात एक भाकरी जास्त पडायची. मग क्षणभर तिची नजर त्या रिकाम्या जागेकडे जायची, जिथे बसून तिचा मुलगा जेवायचा. ती भाकरी उचलून ठेवायची. “आल्यावर देईन,” स्वतःशीच पुटपुटायची. असेच दिवस सरत गेले. प्रत्येक सकाळी तिच्या मनात एकच आशा असायची, आज तरी लेकरू परत येईल. प्रत्येक संध्याकाळी तिची नजर घराच्या दाराकडे लागलेली असायची. रस्त्यावर घोड्यांच्या टापांचा आवाज आला की ती लगबगीने बाहेर यायची. कुणाची चाहूल लागली की क्षणभर तिच्या चेहऱ्यावर आनंद उमटायचा. पण प्रत्येक वेळी रस्ता रिकामाच असायचा आणि तिच्या डोळ्यांतली आशा पुन्हा उद्याच्या वाटेकडे लागायची. तोवर काही दिवसांनी गावात कुणीतरी बातमी घेऊन आलं. महाराजांच्या सैन्यानं मोठा विजय मिळवला होता. गावात आनंदाची लाट पसरली. कुणी साखर वाटली, कुणी देवापुढे दिवा लावला. स्वराज्याचा जयजयकार सुरू झाला. गावातल्या पुरुषांच्या चेहऱ्यावर अभिमान होता. स्त्रियांच्या डोळ्यांत समाधान आलं. ती आईही घराबाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर कित्येक दिवसांनी खरं हसू उमटलं. तिनं बातमी आणणाऱ्या माणसाला जवळ बोलावलं आणि थरथरत्या आवाजात विचारलं, “बाळा, माझा लेक होता का रे त्या मोहिमेत? काही पाहिलंस का त्याला? कुणी त्याचं नाव घेतलं का?” त्या माणसाच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू विरलं. त्याने नजर खाली घातली. क्षणभर तो काहीच बोलला नाही. त्या शांततेतच तिला काहीतरी समजल्यासारखं झालं. तिनं त्याचा हात धरला. “अरे, बोल ना! माझा लेक कुठं आहे? जखमी झालाय का? कुठं थांबलाय? सांग ना रे!” त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. तो हळूच म्हणाला, “मावशी… तो लढला. शेवटपर्यंत लढला. स्वराज्याच्या कामी आला…” पुढचे शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडलेच नाहीत. आईचा हात त्याच्या हातातून निसटला. तिनं वर आकाशाकडे पाहिलं. आणि पुढच्याच क्षणी ती खाली बसली. ज्या स्वराज्याच्या विजयाची बातमी ऐकून ती आनंदली होती, त्याच विजयाच्या किमतीत तिच्या आयुष्याचा सर्वांत मोठा आधार निघून गेला होता. त्या दिवशी गावात विजय साजरा झाला. पण एका घरात आयुष्यभर न संपणाऱ्या प्रतीक्षेची सुरुवात झाली. रात्र झाली. गाव पुन्हा शांत झालं. घराघरांत दिवे विझले. लोक झोपले. पण त्या आईच्या घरातला दिवा आजही तेवत होता. तिनं दार उघडं ठेवलं होतं. तिला माहीत होतं, आता तिचा मुलगा येणार नव्हता. तरीही तिचे डोळे वारंवार रस्त्याकडे वळत होते. कदाचित मनाला सत्य मान्य होत नव्हतं. कदाचित आईच्या मनाला मृत्यूची बातमी समजू शकत होती पण आपल्या लेकराची ती पोकळी स्वीकारता येत नव्हती. ती हळूहळू उठली. घराच्या कोपऱ्यात ठेवलेली त्याची जुनी तलवार हातात घेतली. तलवारीच्या मुठीवरून हात फिरवला. मग ती छातीशी धरली. तिला त्याच्या बालपणाची आठवण झाली. लहानपणी तलवारीऐवजी लाकडाची काठी घेऊन तो घरभर फिरायचा. आईच्या पदराआड लपून म्हणायचा, “मी मोठा झालो की महाराजांसारखा होणार!” तेव्हा ती हसून त्याला जवळ घ्यायची. आज तो खरंच स्वराज्यासाठी लढला होता. त्याने आईला दिलेला शब्द पाळला होता. पण त्या शब्दाच्या बदल्यात आईच्या पदरात काय आलं होतं? एक जुनी तलवार. काही आठवणी. आणि आयुष्यभर न संपणारी पोकळी. तिनं तलवार जागेवर ठेवली. दाराजवळ येऊन बसली. दिव्याचं तेल संपत आलं होतं. तिनं थोडंसं तेल ओतलं आणि वात पुन्हा सरळ केली. मग अंधारातल्या रस्त्याकडे पाहत ती पुटपुटली, “बाळा… स्वराज्याचं काम केलंस ना तू? मग ठीक आहे रे. तुझी आई तुझ्यावर नाही रागावणार…” क्षणभर तिचा आवाज थरथरला. “पण एकदा तरी यायचंस रे घरी. एकदा तरी आई म्हणत हाक मारायची होती मला. एकदा तरी तुझ्या डोक्यावरून हात फिरवायचा होता…” तिचा कंठ दाटून आला. “तू म्हणाला होतास ना, येतो म्हणून? मग असा कसा रे शब्द मोडलास?” ती एकटीच त्या अंधारात बोलत होती. उत्तर देणारं कुणीच नव्हतं. आणि दारातला दिवा मात्र अजूनही तेवत होता... लिखित, श्रेयस समिंद्र पाटील ✍🏻© टीप: हा लेख स्वराज्यासाठी लढलेल्या अनामिक मावळ्यांच्या कुटुंबांच्या भावविश्वावर आधारित काल्पनिक साहित्यलेखन आहे; विशिष्ट ऐतिहासिक व्यक्तीची प्रमाणित घटना म्हणून तो मांडलेला नाही.