रायगडाच्या राजदालनात त्या दिवशी शब्दांनाही जणू पायांचा आवाज करायची भीती वाटत होती. नुकतीच खांदेरी-उंदेरीची मोहीम यशस्वी होऊन इंग्रजांनी मराठ्यांच्या सोबत तह केला होता. संपूर्ण स्वराज्यात आनंदाची लहर होती. समुद्रावरही आता भगव्याचा दरारा निर्माण झाला होता. पण राजदालनात मात्र एक विलक्षण शांतता पसरली होती. स्वराज्य दिवसेंदिवस विस्तारत होतं पण त्या स्वराज्याला जन्म देणाऱ्या राजाच्या देहावर काळाची सावली गडद होत चालली होती. दालनाबाहेर शेकडो मावळे उभे होते, वैद्य येत जात होते, बाहेर उभा असणाऱ्या पहारेकऱ्यांना सुद्धा वाटत होतं की माझ्या राजासोबत शेवटचं चार शब्द बोलावं पण आत जाण्याची हिंमतच कोणाची होत नव्हती. तोवर त्यांच्यातलाच एक तरुण मावळा धीर करून आत गेला. महाराजांच्या चरणाशी बसला. ओठ थरथरत म्हणाला... "राजं..." महाराजांनी अलगद डोळे उघडले. "बोल रं..." "एक इचारू?" "इचार." मावळ्याने मान खाली घातली. "राजं... एवढं मोठं स्वराज्य उभं केलं. शेकडो लढाया जिंकलात. पण तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई कोणती?" क्षणभर महाराज काहीच बोलले नाहीत. दूर कुठंतरी नजर हरवली आणि मग ओठांवर हलकंसं हसू उमटलं. "कमाई?" "अरे येड्या... गड, किल्ले, दौलत, राज्य... ही कसली कमाई?" "माझी खरी कमाई तर माझी माणसं होती रं..." "गोदाजी... कावजी... येसाजी... तान्हाजी... बाजी... कोंडाजी... भैरोजी... अशी किती नावं सांगू?" "आम्ही सगळे एका स्वप्नामागं धावत होतो. कोणाचा संसार राहिला... कोणाची लेकरं लहान होती... कोणाच्या आईच्या डोळ्यात पाणी होतं... पण कुणीच मागं फिरून बघितलं नाही बघ." महाराजांचा आवाज भरून आला. "बाजी काकांनी बेलसरला रक्त सांडलं आणि त्या रक्तानं मावळ्यांच्या छातीतली आग अजूनच धगधगली." "पन्हाळ्यावर अडकलो होतो... तेव्हा त्यो शिवा काशीद... माझंच रूप घेऊन मृत्यूच्या दारात चालत गेला. जाणून होता की परत येणार न्हाय. तरी म्हणाला 'राजं, तुम्ही जगा... स्वराज्य जगलं पाहिजे.' हे सांगताना महाराजांच्या डोळ्यांत पाणी तरळलं. "बाजीप्रभू... अरे, बाजी काकांनी तरी तीनशे मावळ्यांसकट खिंड रोखली. मी विशाळगडावर पोहोचावं म्हणून सगळेच त्या खिंडीत पडले. कोणीच मागं फिरलं न्हाय रं..." महाराजांनी डोळे मिटले. "माझा तान्हा... रायबाच्या लग्नाची हळद घरात असताना कोंढाणा जिंकायला गेला. लोक म्हणाले 'गड आला...' पण माझ्यासाठी... 'माझा मित्र गेला रं, माझा सिंह मात्र मला आणि त्याच्या रायबाला कायमचा सोडून गेला!" क्षणभर महाराजांच्या तोंडून शब्दच फुटेनात. "प्रतापराव... एका चुकीसाठी मी त्यांना रागानं पत्र लिहिलं. पण त्यांनी उत्तराच्या बदल्यात थेट नेसरीच्या रणात स्वतःचं रक्त लिहून पाठवलं." महाराजांचा कंठ दाटून आला. "दक्षिण दिग्विजयात नागोजी माझ्या डोळ्यांसमोर कोसळला. क्षणभर सर्जेरावांची नजर आपल्या लेकरावर खिळली. बापाचं काळीज दाटून आलं असेल रं.. पण पुढच्याच क्षणी त्यांनी लगाम आवळला. कारण त्यांना ठाऊक होतं की आत्ता इथं थांबलो तर मोहिम थांबेल. म्हणून त्यानं तव्हा स्वतःच्या काळजाचा तुकडा रणांगणावरच सोडला आणि स्वराज्याची वाट धरली. महाराजांच्या चरणाशी बसलेल्या त्या मावळ्याच्या डोळ्यांतून अश्रू गालावर ओघळले. महाराजांनी त्याचा हात हातात घेतला. "ऐक रं... उद्या इतिहास काय लिहील ठाव नाही. लोक म्हणतील शिवाजी राजांनी स्वराज्य उभं केलं. पण ते खोटं हाय. शिवाजी एकटा काहीच करू शकला नसता. हे स्वराज्य माझ्या मित्रांच्या खांद्यावर उभं राहिलं. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्यासाठी घरदार सोडलं, हसत हसत प्राण दिले आणि त्या प्रत्येकाच्या रक्तातून हे स्वराज्य उभं राहिलं. राजा मी दिसलो पण पाया ते घालून गेले. त्यांनी मला राजा केलं आणि मला एकटं करत करत स्वतः मात्र निघून गेले." दालनात पुन्हा शांतता पसरली. इतकी की महाराजांचा प्रत्येक श्वासही ऐकू येत होता. बाहेर उभे असलेले मावळेसुद्धा नकळत कान देऊन उभे होते. महाराजांनी हळूच डोळे मिटले. बराच वेळ काहीच बोलले नाहीत. मग खिडकीबाहेर नजर लावून ते हळूच पुटपुटले... "देवानं मला भरभरून दिलं रं... स्वराज्य दिलं... मान दिला... कीर्ती दिली... पण एक गोष्ट मात्र परत घेऊन गेला... माझी माणसं!! म्हणून पुन्हा जन्म घालायचाच ठरवला असेल ना तर राजा करू नकोस... राज्यही नको देऊस... फक्त... माझी हीच सवंगडी पुन्हा दे. बाकी सगळं मी पुन्हा उभं करीन!!" त्यो मावळा बी आपलं पाणावलेलं डोळं अलगद पुसत उठला. महाराजांना मुजरा घातला... अन् आज राजांच्या मनात दडलेला शिवबा ऐकायला मिळाला, ह्या समाधानानं जड पावलांनी दालनाबाहेर निघून गेला.. लिखित, श्रेयस अस्मिता समिंद्र पाटील