← सर्व लेख
लेख
रात्र काळीकुट्ट झाली होती. आषाढ वद्य प्रतिपदेच्या त्या भयाण रात्री काळ्याकभिन्न ढगांनी आभाळ गिळून टाकलं होतं. मुसळधार पाऊस पन्हाळगडाच्या तटांवर अक्षरशः तुटून पडत होता. वारा घोंघावत होता, विजांचा कडकडाट दऱ्याखोऱ्यांना दणाणून सोडत होता आणि दूरवर सिद्दी जौहरच्या छावणीतील मशाली अंधाराला छेद देत लुकलुकत होत्या. शत्रूला जरासुद्धा चाहूल लागू न देता इकडं राजं आपल्या सहाशे बांदल मावळ्यांसह गडाबाहेर पडले. थोडं अंतर पार झालं आणि दोन्ही पालख्या थांबल्या. एका पालखीतून महाराज खाली उतरले आणि दुसऱ्या पालखीतून शिवा काशीद. कदाचित ही त्यांची अखेरची भेट ठरणार होती. शिवा काशीदनं कंबरेत वाकत एक हात पुढं करत आपल्या धन्याला अखेरचा मुजरा घातला. महाराजांनी क्षणार्धात त्याचे हात धरले. त्याच्याशी बोलण्यासाठी अलगद उभं केलं. पण ओठांवर शब्द फुटेचना. घशात आवंढा दाटला. शेवटी थरथरत्या आवाजात तेवढंच बोलले...
"शिवा..."
शिवा हसला. ते हसू मृत्यूला हरवणारं होतं. अन् म्हणाला..
"राजं... लोक म्हणत्यात, माझं तोंड तुमच्यासारखं दिसतं. आज देवानं दिलेल्या त्या साम्याचं चीज करायची वेळ आलीया. आज एक दिवस मला तुमची कापडं घालायला मिळत्यात... साक्षात शिवाजी राजा व्हायची वेळ माझ्यासारख्या साध्या न्हाव्यावर आली... माझ्या सात पिढ्यांचं भाग्य फळाला आलं म्हणायचं!"
महाराजांच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
"शिवा... हे भाग्य न्हाय रे... ही माझ्यासाठी फार मोठी शिक्षा हाय. तुझ्या आईबापांना मी काय तोंड दाखवू?"
शिवानं मान हलवत हलकंसं हसत उत्तर दिलं,
"असं कसं म्हणता राजं? मावळा जन्माला येतोच कशासाठी? धनीच्या जीवावर बेतलं तर स्वतःचा जीव पुढं करायला! माझ्यासारखे हजार शिवा मिळतील... पण तुमच्यासारखा शिवबा राजा परत जन्माला यायला अख्ख्या महाराष्ट्राला युगं वाट बघावी लागतील. आणि आई-बापाला सांगा... त्यांचा लेक मेला नाय.. स्वराज्याच्या नावानं अमर व्हायला गेलाय."
हे ऐकताच महाराजांच्या डोळ्यांत साचलेला अश्रूंचा बांध फुटला. त्यांनी शिवाला कडकडून मिठी मारली.दचकन महाराजांच्या डोळ्यांतून निसटलेले दोन गरम अश्रू शिवाच्या खांद्यावर पडले. महाराजांचा कंठ भरून आला.
"शिवा... तुझं हे ऋण मी जन्मोजन्मी फेडू शकणार नाय..."
इतकंच म्हणत ती मिठी अलगद ढिली झाली. शिवानं पुन्हा एकदा कंबरेत वाकून आपल्या राजांना अखेरचा मुजरा घातला. भरून आलेल्या डोळ्यांनी आपल्या धन्याचं रूप शेवटचं हृदयात साठवून घेत न्हाव्याचा शिवा, मृत्यूच्या उंबरठ्यावरही ओठांवर स्मित घेऊन, सिद्दी जौहरची दिशाभूल करायला आणि आपल्या राजांना विशाळगड गाठण्यासाठी अमूल्य अवकाश मिळवून द्यायला... साक्षात शिवबा राजा होऊन त्या नियतीच्या वाटेनं निघून गेला!
लिखित,
श्रेयस अस्मिता समिंद्र पाटील ©️
रात्र काळीकुट्ट........
17 October 2026