राजगडावरचा तो दिवस नेहमीसारखाच चालत होता. वाऱ्याने महालाच्या खिडक्या थोड्या थोड्या हलत होत्या. बाहेर पहारेकरी उभे होते. कुठंतरी मशाली पेटल्या होत्या. महालातल्या स्त्रियांची धावपळ सुरू होती. वैद्य येत-जात होते. औषधांपेक्षा जास्त गोष्टी नशिबावर सोडाव्या लागत होत्या. त्या दिवशी नियती शांतपणे स्वराज्याच्या इतिहासातली एक अशी जखम लिहीत होती, जी पुढे कित्येक वर्षं एका लेकराच्या आयुष्यात धगधगत राहणार होती. महालाच्या एका दालनात आईच्या कुशीत छोटासा शंभू शांत झोपला होता. सईबाईंचा हात हळूवारपणे त्याच्या डोक्यावरून फिरत होता. त्या बराच वेळ शंभूराजांकडे फक्त पाहत होत्या. जणू डोळ्यांतच त्याला साठवून घेत होत्या. समोर शांत झोपलेलं ते छोटंसं लेकरू अधूनमधून झोपेतच कुशी बदलत होतं. सईबाईंचा हात त्याच्या डोक्यावरून फिरत होता पण मन मात्र कुठल्याशा अज्ञात भीतीने भरून आलं होतं. डोळ्यांत पाणी होतं तरी त्या हसण्याचा प्रयत्न करत होत्या. शंभूराजे जागे होऊ नयेत म्हणून त्यांनी अलगद त्याला अजून जवळ घेतलं. त्या क्षणी त्यांना स्वतःच्या वेदना जाणवतही नव्हत्या. त्यांच्या मनात फक्त समोर झोपलेला शंभू होता आणि त्याचं पुढचं आयुष्य दिसतं होतं. शंभूराजे अजून खूप छोटे होते. त्यांना राजकारण माहीत नव्हतं, मृत्यू माहीत नव्हता, विरह माहीत नव्हता. त्यांच्यासाठी जग म्हणजे आईची कुशी होती. त्या कुशीत झोपताना बाहेर किती वादळं आहेत याची त्यांना कल्पनाही नव्हती. सईबाई मात्र त्या छोट्याशा चेहऱ्याकडे पाहताना आतून तुटत होत्या. हा पुढे कसा वाढेल ? रडला तर कोण जवळ घेईल ? रात्री घाबरून उठला तर कोण छातीशी कवटाळेल ? तापाने फणफणला तर कपाळावर हात कोण ठेवेल ? असे कितीतरी प्रश्न त्यांच्या डोळ्यांत दाटून आले होते. महालात कुणाचे पावलांचे आवाज येत होते, कुणी हळू आवाजात बोलत होतं, वैद्य पुन्हा औषध घेऊन आत-बाहेर करत होते पण त्या दालनात मात्र एक विचित्र शांतता पसरली होती. सईबाईंनी अलगद पुढे होत शंभूराजांच्या कपाळावर ओठ टेकवले. जणू तो क्षण थोडा अजून थांबावा म्हणून बराच वेळ त्या तशाच थांबल्या. बाहेर राजगड नेहमीसारखाच उभा होता पण त्या आईचं मन मात्र आतून पूर्ण ढासळत होतं. वेळ पुढे सरकत होता तसं महालातलं वातावरण अजून जड होत गेलं. मशालींचा उजेड दालनाच्या भिंतींवर हलत होता. वैद्यांचे आवाज मंद होत चालले होते. कुणी काही बोलत नव्हतं पण सगळ्यांना काहीतरी निसटत चालल्याची जाणीव होत होती. सईबाई अधूनमधून डोळे उघडून शंभूराजांकडे पाहत होत्या. जणू अजून थोडा वेळ त्याला पाहता यावं म्हणून नियतीलाच विनवत होत्या. रात्र सरत गेली तसं दालनातले आवाज कमी होत गेले. वैद्यांचे हात थांबले. आसपास उभ्या असलेल्या स्त्रियांच्या डोळ्यांतलं पाणी आता लपवूनही लपत नव्हतं. सईबाईंचा हात अजूनही शंभूराजांच्या अंगावर होता पण काही क्षणांनी तो हळूहळू निसटत खाली सरकला. दालनात उभ्या असलेल्या एका स्त्रीच्या हुंदक्याने ती शांतता तुटली. मशालींचा उजेड भिंतींवर हलत होता आणि आईच्या कुशीत शांत झोपलेल्या त्या छोट्या शंभूला अजून काहीच समजलं नव्हतं. त्याला कल्पनाही नव्हती की ज्या कुशीत तो इतक्या शांतपणे झोपलाय त्या कुशीचा श्वास आता कायमचा थांबला होता. सव्वादोन वर्षांच्या शंभूराजांना त्या तिथंच मागे सोडून निघून गेल्या होत्या. अजून आईचा हात घट्ट पकडून झोपायचं वय होतं त्यांचं, रात्री घाबरलं की कुशीत शिरायचं वय होतं, “आई” एवढाच ज्याच्या छोट्याशा जगाचा अर्थ होता, त्या लेकराच्या आयुष्यातून नियतीने तीच व्यक्ती हिरावून घेतली होती. शंभूराजे मात्र अजूनही आईचा हात अंगावर आहे असं समजून शांत झोपले होते. त्यांना कुठं माहिती होतं… की काही क्षणांपूर्वीच त्यांच्या डोक्यावरून फिरणारा तो हात आता पुन्हा कधीच फिरणार नव्हता!!🥺 लिखित, श्रेयस समिंद्र पाटील ✍🏻©