राजगडाच्या पद्मावती माचीवर पहाट हळूहळू उजाडत होती. सह्याद्रीच्या रांगांवर सोनेरी किरणं पसरू लागली होती. तटावर दोन मावळे पहारा देत उभे होते. एकाच्या नजरा सारख्या रायगडाच्या दिशेनं जात होत्या. शेवटी तोच बोलला. "काय रं... आज रायगड कसा दिसत असंल ना?" दुसरा हसला. "आजच कशाला?" "अरे, आजचा दिवसच तसा हाय. आपल्या राजांचा राज्याभिषेक. किती वर्षं वाट बघितली असंल लोकांनी या दिवसाची..." तो क्षणभर थांबला. "राजसदर भरली असंल, नगारे घुमत असतील, तोफा दणाणत असतील, भगवे झेंडे वाऱ्यावर डोलत असतील, फुलांनी गड नटून गेला असंल." त्याने एक दीर्घ श्वास घेतला. "आणि त्या सिंहासनावर आपला राजा..." त्याचे शब्द तिथेच अडकले. दुसऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. "मनात हाय ना, तिकडं असायचं?" "मनात काय... जीव तुटतोय रं." पहिल्याच्या आवाजातली ओढ आता स्पष्ट जाणवत होती. "इतकी वर्षं तलवार उगारली, लढाया केल्या, रक्त सांडलं... आणि आजचा दिवस आला तर आपण इथं पहाऱ्याला." काही क्षण दोघेही शांत. मंद वाऱ्याची झुळूक आली. मग दुसरा मावळा हळूहळू म्हणाला, "आणि आपण गेलो असतो तर हा गड कोण सांभाळला असता?" पहिल्याने काही उत्तर दिलं नाही. "अरे, आज रायगडावर हजारो लोक असतील. पण या वेळेला महाराष्ट्रभर कितीतरी गडांवर आपल्यासारखेच मावळे उभे असतील. कुणाच्या नशिबीही नाही हा सोहळा." त्याने दूर क्षितिजाकडे पाहिलं. "पण त्याची खंत कोणाच्या चेहऱ्यावर दिसणार नाही." "का?" "कारण आपण सोहळा पाहण्यासाठी नाही जन्मलो..." तो थांबला. "...सोहळे घडवण्यासाठी जन्मलो." पहिला मावळा त्याच्याकडे पाहत राहिला. पुन्हा वाऱ्याची एक झुळूक आली. दूरवर कुठेतरी तोफेचा आवाज घुमला. दोघांचेही कान त्या दिशेनं वळले. पहिल्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. "बहुतेक... महाराज सिंहासनावर बसले वाटतं." दुसऱ्याने नकळत आपला हात छातीवर ठेवला. "बसू देत." त्याचा आवाज भरून आला होता. "आपण नसू तिथं... पण आपली निष्ठा तिथं पोहोचली असंल बघ." 🥺 दोघे पुन्हा तटाकडे वळले. पहारा तसाच सुरू होता, सूर्य वर चढत होता. श्रीमान रायगडावर मंगलवाद्यांचे स्वर घुमत होते, महाराजांच्या मस्तकी छत्र चढत होते. आणि त्याच वेळी सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांवर, गडागडांच्या तटांवर, हजारो मावळे आपल्या जागी निश्चल उभे होते. त्या दिवशी सिंहासनावर एकच राजा विराजमान झाला होता पण त्या राजाच्या स्वराज्याभोवती हजारो निष्ठावंत हृदये कवच बनून उभी होतीत! लिखित, श्रेयस अस्मिता समिंद्र पाटील ✍🏻©