मोहीम क्र 5: सुरवातीच्या मोहीमा (लोहगड)
About this trek
लहानपणी गड-किल्ल्यांच्या भेटीची आठवण अजूनही ताजी आहे. कुटुंबासोबत फिरताना या किल्ल्यांचा भव्य इतिहास मनात ठसला होता पण त्यावेळी या स्थळांचे खरे महत्त्व पूर्णपणे उमगले नव्हते. मात्र १० वी नंतर पुण्यात आल्यावर परिस्थिती बदलली. इथे आल्यावर ट्रेकिंगची आवड निर्माण झाली, जी १२वी नंतर आणखीनच बहरली. ट्रेकिंगच्या माध्यमातून गड किल्ल्यांवर अनेकदा भेटी दिल्या. मित्रांच्या सोबत ट्रेकिंग सुरू असताना, प्रत्येक किल्ल्यावर दिसणारा कचरा आणि नासाडी मनाला टोचत होती. महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या या गडकिल्ल्यांचा असा अपमान होताना पाहून काहीतरी करण्याची जाणीव निर्माण झाली. मनात सतत विचार यायचा, “माझ्या महाराजांसाठी आणि देशासाठी मी काहीतरी मोठं करीन पण त्यासाठी मोठं होण्याची वाट का बघायची? काहीतरी आत्ताच का करू नये?” लहानपणापासून शिवरायांच्या इतिहासाची आवड होतीच. त्यांच्या प्रत्येक योशोगाथेतून प्रेरणा मिळायची. त्यांच्याच विचारांनी प्रेरित होऊन गड किल्ल्यांची दुर्दशा थांबवण्यासाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला. त्यावेळी ना ठोस योजना होती, ना स्पष्ट दिशादर्शन. पण मनात एक गोष्ट ठाम होती “आपल्याला गप्प बसायचं नाही, काहीतरी करून दाखवायचं आहे.” याच इच्छेने आणि समर्पणातून "सेवक सह्याद्रीचे" परिवाराची संकल्पना जन्माला आली. ही केवळ एक संकल्पना नाही तर तरुणांना एकत्र करून महाराजांच्या स्वराज्याचा गौरव परत आणण्याचा आणि त्यांचा आदर्श घेऊन समाजात परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक गड आपल्या महाराजांच्या कर्तृत्वाचा साक्षीदार आहे. या गडांवर इतिहासाची नुसती ओळख नव्हे तर त्यांची निगा राखणे ही आपली जबाबदारी आहे. याच विचाराने सुरुवात झाली, ज्यामध्ये फक्त "काहीतरी केलं पाहिजे" हा निर्धार होता आणि पुढे याच विचाराने सेवक सह्याद्रीचे परिवाराचे स्वप्न सत्यात उतरवले