दुर्गदुर्गेश्वर श्रीमान श्री रायगडाबद्दल बोलावं तितकं कमी आहे. ज्या रायगडाने हिंदुस्थानचा पहिला स्वातंत्र्यदिन पाहिला, त्याच रायगडाने अवघ्या सहा वर्षांनी त्या अभिषिक्त राजाचे अखेरचे दिवसही पाहिले. हनुमान जयंतीच्या त्या सकाळी राजवैद्यांची लागबग पाहून या गडाच्याही काळजात धस्स झालं असेल! "राजे, तुम्ही गेल्यावर माझं काय?" हा प्रश्न त्यालाही पडला असेल. पण नियतीसमोर कोणाचंच चालत नाही. जे घडू नये, तेच घडलं. महाराज निघून गेले... पण मला नेहमी वाटतं, रायगडाने महाराजांना कधीच जाऊ दिलं नाही. त्याने त्यांना आपल्या दगडांत, आपल्या मातीत, आपल्या वाऱ्यात आणि आपल्या शांततेत कायमचं जपून ठेवलंय. परवा राजाभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा रायगडावर जाण्याचा योग आला. समाधीचं दर्शन घेतलं आणि नकळत तिथेच खाली बसलो. सहसा दर्शन झालं की लगेच निघून येतो. यावेळी मात्र पाय उठेनात. बाहेर राजाभिषेक सोहळ्याची लगबग सुरू होती, लोकांची वर्दळ सतत चालू होती पण समाधीच्या त्या आवारात पाऊल टाकताच वातावरणाचा स्वरच बदलून गेला. त्या परिसराची विलक्षण शांतता अंगावर येऊन विसावली. मी काही बोलत नव्हतो. समाधीही काही बोलत नव्हती. पण त्या शांततेत मनात कितीतरी विचार उमटत होते. समोरची समाधी पाहताना ती समाधी वाटतच नव्हती. वाटत होतं, काळानं इथं आपलं एक पान कायमचं उघडं ठेवलेलं आहे. त्या दगडांत अजूनही त्या दिवसाची ऊब शिल्लक आहे. त्या शांततेत बसल्यावर मनात एक विचार वारंवार येत राहिला. एखाद्या माणसाने आयुष्य किती विलक्षण जगलं असेल, की त्याच्या जाण्यानंतर शतकानुशतकं उलटून गेली तरी त्यांची अनुपस्थिती कुणालाच जाणवत नाही. उलट त्यांची उपस्थिती अधिकाधिक गहिरी होत जाते. म्हणूनच कदाचित रायगडावर गेलं की महाराज "होते" असं म्हणण्याची हिंमत होत नाही. तिथे गेल्यावर सहज तोंडातून निघतं की महाराज आहेत. आणि खरंच त्या दिवशी मला रायगडाचं मौन समजलं. रायगड रडत नाही, तो बोलत नाही, तो स्वतःचा इतिहास सांगत नाही. तो फक्त शांत उभा आहे. कारण ज्याच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराज चिरविश्रांती घेत आहेत, त्या गडाला स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्याची गरजच काय? त्याच्या प्रत्येक दगडात महाराजांचं अस्तित्व कोरलेलं आहे. कदाचित म्हणूनच वाटतं या रायगडाने महाराजांना कधीच जाऊ दिलं नाही आणि आजसुद्धा जो एकदा मनापासून रायगडावर जातो, त्यालाही रायगड पूर्णपणे परत येऊ देत नाही!!🙏🚩 लिखित, श्रेयस अस्मिता समिंद्र पाटील ✍🏻©