← सर्व लेख
लेख
राज्याभिषेकाच्या सोहळ्यानंतर काही काळ जिजाऊ शांत बसल्या होत्या. रायगडावर मंगलवाद्यांचे स्वर अजूनही घुमत होते. जयजयकाराचे आवाज दरबारातून बाहेर पडून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत पसरत होते.
पण जिजाऊंचे डोळे त्या सोहळ्यात नव्हते. ते अनेक वर्षं मागे फिरले होते. त्या मंद हसल्या.
"शिवबा..."
त्यांच्या ओठांवरून शब्द अलगद उमटला.
"आज सारा मुलुख तुला छत्रपती म्हणतोय...
पण माझ्या डोळ्यांसमोर अजूनही लालमहालात धावणारा तोच शिवबा उभा हाय."
क्षणभर त्या गप्प झाल्या.
"आठवतंय मला...
रात्रीच्या काळोखात तुला मांडीवर घेऊन शूरांच्या गोष्टी सांगायचे ते दिवस. रामायण सांगितलं, महाभारत सांगितलं. पण त्याहीपेक्षा जास्त सांगितलं ते या भूमीचं दुःख."
त्यांच्या डोळ्यांत न कळत पाणी दाटलं.
"किती वेळा विचारायचास...
'आईसाहेब, आपला राजा कोण?'
तेव्हा उत्तर नव्हतं माझ्याकडं.
पण आज आहे."
त्यांनी दूर सिंहासनाकडे पाहिलं.
"आज या भूमीचा राजा सिंहासनावर बसलाय."
रायगडावरचा वारा हळूच वाहून गेला. जिजाऊंचा आवाज आणखी खोल झाला.
"पण शिवबा...
या सिंहासनापर्यंतचा रस्ता सोपा नव्हता रं!"
त्यांच्या डोळ्यांसमोर अनेक चेहरे तरळून गेले.
"किती माणसं हरवली, किती आईंच्या कुशा रिकाम्या झाल्या, किती बायकांच्या कपाळचं कुंकू पुसलं गेलं, किती लेकरं पोरकी झाली..."
क्षणभर त्या बोलू शकल्या नाहीत. मग त्यांनी डोळे मिटले.
"आज तुझ्या मस्तकी छत्र चढलं...
पण मला त्या छत्राखाली असंख्य मावळ्यांची सावली दिसतेय."
दूरवर पुन्हा एकदा जयजयकार घुमला.
"छत्रपती शिवाजी महाराज की जय!"
जिजाऊंच्या डोळ्यांतून अश्रू ओघळला. त्या मंद स्वरात म्हणाल्या,
"नाही...
हा जयजयकार फक्त माझ्या शिवबाचा नाही. हा त्या प्रत्येकाचा आहे ज्याने स्वराज्यावर जीव ओवाळून टाकला."
त्या पुन्हा सिंहासनाकडे पाहू लागल्या. चेहऱ्यावर समाधान होतं. आणि पुढच्याच क्षणी आठवणींनी मनाचा बांध फोडला..
"शिवबा.. आज तुमचे आबासाहेब हवे होते ओ इथं...
ज्या लेकराच्या डोळ्यांत त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पेरलं, त्याच स्वप्नाला आज सिंहासनावर विराजमान होताना पाहायचं राहुनच गेलं!"
लिखित,
श्रेयस अस्मिता समिंद्र पाटील ✍🏻
शिवबा... आज तुमचे आबासाहेब हवे होते ओ इथं...
17 October 2026