मोहीम क्र. 6 : किल्ले तिकोना – पहिली मोठी पावलं
About this trek
मोहीम क्र. 6 : किल्ले तिकोना – पहिली मोठी पावलं दिनांक : २ ऑक्टोबर २०२४ पावसाळा नुकताच संपला होता. हवामान खुलं होतं आणि आमचं मनही आता अधिक नियोजनबद्ध कामासाठी सज्ज होत होतं. त्यामुळे ठरवलं "यावेळी गड स्वच्छतेसाठी मोठं पाऊल उचलायचं!" आणि त्यासाठीच आम्ही प्रायव्हेट बसचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून जास्तीत जास्त लोक गडावर येऊ शकतील. जेव्हा ही माहिती आम्ही ग्रुपवर शेअर केली, तेव्हा काही दिवसांतच ५१ जणांची यादी तयार झाली. विशेष म्हणजे त्यात ११ मुलींचाही समावेश होता. आमच्यासाठी ही मोठी जबाबदारी आणि एक नवीन अनुभव होता. आता खरी परीक्षा सुरू झाली होती नियोजनाची! संपूर्ण मित्रपरिवाराने जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. 👉 पोस्टर्स तयार करणे, 👉 नवीन "सेवक सह्याद्रीचे" बॅजेस बनवणे, 👉 First Aid Kit ची व्यवस्था, 👉 आणि सर्वसामान्य सहभागींना सुरक्षितपणे गडावर नेणं व परत आणणं. आणि अखेर तो दिवस उजाडला. तिकोना किल्ल्याची गडभ्रमंती आणि त्यासोबतच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेतील सर्व ५१ मावळ्यांनी एकदिलाने काम केलं. गडाच्या प्रत्येक वाटेवर, दरवाज्यावर, बुरुजावर कुठेही कचरा दिसला नाही. गडाने जणू स्वतःच त्यांच्या कार्याला सलामी दिली. ही मोहीम यशस्वी होणं हे आमच्यासाठी फक्त एक यश नव्हतं तर पुढील अनेक मोहिमांची दिशा होती.